Thursday, June 25, 2009

हरिनामाच्या छंदात तुकोबा पालखी सोहळा निमगाव केतकीत विसावला

हरिनामाच्या छंदात तुकोबा पालखी सोहळा निमगाव केतकीत विसावला
राजेंद्रकृष्ण कापसे
निमगावकेतकी - बेलवडीतील पहिले गोल रिंगण... रिंगणानंतरची विश्रांती, तिथीचा क्षय झाल्यामुळे एक मुक्काम रद्द झाला. त्यामुळे वाढलेली वाटचाल, पर्यायाने थकलेले पाय, तरीदेखील हरिनामाच्या छंदात दंग झालेला सोहळा शुक्रवारी रात्री नऊ वाजता निमगाव केतकीत विसावला. शनिवारी सकाळी इंदापूर येथे दुसरे गोल रिंगण होणार आहे.सोहळ्यातील पहिले रिंगण होणार असल्याने पहाटेपासूनच वैष्णवांची लगबग सुरू होती. ग्रामस्थांनी रिंगणाचे मैदान पूर्वीच आखून ठेवले होते. रिंगण सोहळा भक्तीचा हा अनोखा सोहळा टिपण्यासाठी परिसरातील गावातील भाविकांनी गर्दी केली होती. संस्थानचे अध्यक्ष सोनबा मोरे, माजी अध्यक्ष बापूसाहेब देहूकर यांनी चोपदारांना रिंगण लावण्याची सूचना दिली. त्याप्रमाणे निवृत्ती, नामदेव, कानसूरकर, देशमुख, खैरे, शिवाजी गिराम या चोपदारांनी रिंगण लावून घेतले. तसेच सोहळाप्रमुख संजय मोरे, सूर्यकांत मोरे, राजेंद्र मोरे विश्‍वस्त विश्‍वजित मोरे, नितीन मोरे, विश्‍वस्त हे या वेळी उपस्थित होते. प्रथम बाभूळगावकरांच्या अश्‍वावर संत तुकाराम महाराज आरूढ आहेत तो अश्‍व रिंगणात आणला. त्याने दोन प्रदक्षिणा पूर्ण केल्या. नंतर मोहिते-पाटलांचा स्वाराचा अश्‍व रिंगणात आला. त्यानेही वेगात दोन प्रदक्षिणा पूर्ण केल्या. दोन्ही अश्‍व पालखीच्या दिशेने आत आले. त्यानंतर नामदेव चोपदारांनी टाळकरी व पखवाजवादकांना उडीचे निमंत्रण दिले. पालखीभोवती टाळकरी व पखवाजवादकांचा "तुकाराम तुकाराम'चा ठेका सुरू झाला. यातही टाळकरी लयबद्ध हालचाली करीत होते, तसेच विविधध्ये आटापाट्या, फुगड्या, झिम्मा, फेर, कोंबडा फुगडी, बैठी फुगडी, काठवट असे खेळ रंगले होते. रथाची सजावट अविनाश घोलप यांच्या वतीने करण्यात आली होती. राजेशिर्के व निंबाळकर कुटुंबीयांच्या वतीने पादुकांची पूजा करण्यात आली. यंदा तिथीचा क्षय झाला. यामुळे लासुर्णेऐवजी निमगाव केतकीला मुक्काम करण्यात आला. दरम्यान, दर वर्षी 18 किलोमीटर जादा अंतराची वाटचाल वारकऱ्यांना करावी लागली. सोहळा संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास निमगावकडे मार्गस्थ झाला. रात्री नऊ वाजता समाजआरतीनंतर सोहळा मुक्कामी विसावला. येथील अनेक शेतकऱ्यांनी नागवेली (पानविडा)ची पाने वारकऱ्यांना वाटली. हा परिसर नागवेलीच्या पानांचे उत्पादन घेण्यासाठी प्रसिद्ध आहे. आज दुसरे गोल रिंगणइंदापूर येथील शाळेच्या पटांगणावर शनिवारी दुसऱ्या गोल रिंगणाचा सोहळा होणार आहे. त्यासाठी नगरपालिकेने जय्यत तयारी केली आहे.

No comments:

Post a Comment