Sunday, June 28, 2009

पालखीचे उद्योगनगरीत उत्साहात स्वागत

पालखीचे उद्योगनगरीत उत्साहात स्वागत
राजेंद्रकृष्ण कापसे
आकुर्डी - सर्व संतांचे माहेर असलेल्या पंढरीच्या दिशेने निघालेला सोहळा मंगळवारी सकाळी देहूकरांचा निरोप घेत मार्गस्थ झाला. अनगडशहा बाबांच्या दर्ग्याजवळील आरती, तळपत्या उन्हातील वाटचाल, उद्यमनगरीत प्रवेश करताना झालेले जोषपूर्ण स्वागत, यामुळे वातावरण "तुकोबामय' झाले होते. हा सोहळा बुधवारी दुपारनंतर पुण्यनगरीत प्रवेश करणार आहे. तुका म्हणे पेठ ।भूमिवरी हे वैकुंठ ।।संतांच्या कुळात पंढरीची वारी हा गौरवाचा विषय समजला जातो. वारीबरोबर विठ्ठलाच्या भक्तीला एक वेगळे महत्त्व आहे. ही पंढरी सर्व संतांचे, भक्तांचे माहेर आहे. विठ्ठलाच्या आठवणीने भक्तांची अवस्था एखाद्या माहेरवाशिणीसारखीच होते. आजही याच ओढीने सर्व सोहळा पंढरीकडे मार्गस्थ झाला. देहूतील इनामदार वाड्यात पहाटे पादुकांची पूजा जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते झाली. काकड आरतीने दिवस सुरू झाला. भोसरी येथील वाडेकर बंधूंच्या वतीने सोहळ्याची सजावट करण्यात आली होती. देहूकरांच्या वतीने मान्यवरांनी सोहळ्यास निरोप दिला. सामाजिक ऐक्‍याचे प्रतीकदेहूकरांनी अनगडशहा बाबांच्या दर्ग्यापर्यंत पालखी खांद्यावरून आणली. दर्ग्यासमोर संत तुकाराम महाराजांची आरती झाली. अनगडशहा बाबा हे तुकोबारायांचे शिष्य होते. त्यांच्या अभंगांनी व भक्तीने प्रेरित होऊन अनगडशहा बाबांनी त्यांचा अनुग्रह घेतला. त्याबाबत तुकाराम महाराजांनी "प्रसादाच्या धरणेकरी'चे किंवा अकरा अभंग सांगितले आहेत. यातील एक अभंग "चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती' आहे. अशा प्रकारे हिंदू-मुस्लिम ऐक्‍याचे प्रतीक असलेल्या गुरू-शिष्याच्या नात्याने मोठी शिकवण दिलेली आहे. आरतीनंतर पालखी चांदीच्या नव्या रथात ठेवण्यात आली. नंतर सोहळा पुढे मार्गस्थ झाला. देहूरोड छावणी जकात नाक्‍यामार्गे सोहळा पुढे सरकत होता. दुपारचा विसावा चिंचोली पादुका होता. तेथे आरती झाली. विसावा घेऊन सोहळा निगडीकडे मार्गस्थ झाला. सायंकाळी पाचच्या सुमारास सोहळ्याने पिंपरी-चिंचवडच्या हद्दीत प्रवेश केला. भक्ती-शक्ती चौकात महापौर अपर्णा डोके व महापालिका आयुक्त आशिष शर्मा यांच्या हस्ते पादुकांवर पुष्पहार अर्पण करून पालखीचे स्वागत करण्यात आले. टिळक चौकात पालखीने विसावा घेतला. सहा वाजता सोहळा पुढे मार्गस्थ झाला. प्राधिकरण, दत्तवाडी, विठ्ठलवाडीमार्गे आकुर्डीतील गावठाणात पालखी पोचली. हा मार्ग रहिवासी वस्तीतील आहे. संध्याकाळी हरिपाठाचे अभंग सुरू होते. यामुळे येथील सारे वातावरण भक्तिमय झाले होते. सोहळा संथ गतीने विसाव्याच्या ठिकाणी मार्गस्थ झाला. दरम्यान, रस्त्याच्या दुतर्फा अनेक भाविकांनी पादुकांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.संध्याकाळी सव्वासात वाजता सोहळा श्री विठ्ठल मंदिराजवळ आला. "हे माझे मिरासी, ठाव तुझे पायापाशी' हा अभंग होऊन आरती झाली आणि सोहळा मुक्कामासाठी विसावला. रात्री पालखीसमोर देशमुख दिंडीच्या वतीने कीर्तन करण्यात आले. माई दिंडीच्या वतीने जागर करण्यात आला. बुधवारी सकाळी सोहळा पुणे शहराकडे मार्गस्थ होईल.

No comments:

Post a Comment