Sunday, June 28, 2009


संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान
राजेंद्रकृष्ण कापसे

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखीचे प्रदक्षिणेदरम्यान देऊळवाडा येथे घेतलेले छायाचित्र (छायाचित्र - विश्‍वनाथ गरूड, ई-सकाळ)
देहू - तळपत्या उन्हातही देहूनगरीत नामघोषात दंग वारकरी... सर्वत्र सुरू असलेला वीणेचा झंकार... टाळांचा अखंड गजर व तुकोबारायांचा जयघोष...अशा भक्तिमय वातावरणात संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने सायंकाळी चार वाजता येथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. त्यानंतर हा पालखी सोहळा प्रदक्षिणा मार्गाने देहूतील इनामदार वाड्यात मुक्कामासाठी विसावला. उद्या (ता. १६) सकाळी तो पिंपरी-चिंचवडकडे मार्गस्थ होणार आहे.आमुचि मिरास पंढरी ।आमुचे घर भीमातीरी ।। अशा अभंगाच्या घोषात सोमवारी पहाटे विठ्ठल-रुक्‍मिणी व शिळामंदिरात महापूजा करण्यात आली. सकाळी नऊ वाजता बापू महाराज देशमुख यांनी काल्याचे कीर्तन केले. त्यांनी या वेळी "उपजोनि पुढती येऊ, काला खाऊ दही-भात' हा अभंग कीर्तनासाठी घेतला होता. दुपारी अडीच वाजता प्रस्थान सोहळ्यास सुरवात झाली. वीणामंडपात मान्यवर, विणेकरी व मानकरी उपस्थित होते. मावळचे खासदार गजानन बाबर व मानाचे वारकरी लक्ष्मण गंगाराम देशमुख (रा. चिलची वाडी, पंढरपूर) यांच्या हस्ते तुकोबारायांच्या पादुकांची महापूजा करण्यात आली. देशमुख हे तीस वर्षांपासून वारीत सहभागी होत आहेत.संस्थानचे अध्यक्ष सोनबा मोरे, सोहळाप्रमुख सूर्यकांत मोरे, संजय मोरे, राजेंद्र मोरे, विश्‍वस्त पंढरीनाथ मोरे, विश्‍वजित मोरे, नितीन मोरे आदी या वेळी पूजेला बसले होते. शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, पिंपरी-चिंचवडच्या महापौर अपर्णा डोके, प्रतिभा पाचपुते, जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी, पोलिस अधीक्षक रवींद्र कदम, प्रांताधिकारी जयश्री कटारे, तहसीलदार विजय पाटील, सभापती प्रभावती भूमकर, वारकरी, फडकरी दिंडी समाजाचे अध्यक्ष भानुदास ढवळीकर, देहूच्या सरपंच शुभांगी मोरे, उपसरपंच प्रकाश हगवणे या प्रसंगी उपस्थित होते. कोथरूडचे ग्रामोपाध्याय सुभाष टांकसाळे यांनी महापूजेचे पौरोहित्य केले. तीन वाजता आरती झाली. त्यानंतर "पुंडलिक वरदे' व संत तुकाराम महाराजांच्या जयघोषात सोहळ्यासाठी पालखीत पादुका ठेवण्यात आल्या. त्यानंतर पालखी वीणामंडपातून बाहेर येऊन, राऊळवाड्यात मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात आली. दरम्यान, विठ्ठलनामाच्या ठेक्‍यावर वारकऱ्यांचे विविध खेळ भर उन्हात रंगले होते. टाळ, पखवाज, वीणा-चिपळ्यांच्या तालावर मनोरे, फुगड्या, झिम्मा, फेर, कोंबडा फुगडी, बैठी फुगडी असे खेळ खेळण्यात आले. खेळात दंग झालेल्या वारकऱ्यांच्या अंगातून उन्हामुळे घामाच्या धारा वाहत होत्या. त्यानंतर प्रदक्षिणा मार्गाने सोहळा देहूतील इनामदार वाड्यात मुक्कामासाठी विसावला. उद्या (ता. १६) सकाळी सोहळा आकुर्डीकडे मार्गस्थ होणार आहे.चर्चा पेरणीची, पावसाचीपालखी सोहळा सुरू होण्यापूर्वी 'श्रीं'चे दर्शन घेऊन मंदिरात, नदीकाठी बसलेल्या राज्यभरातील वारकऱ्यांमध्ये चर्चा होती ती पेरण्या खोळंबल्याची; पावसाने ओढ दिल्याची. 'मृग नक्षत्र कोरडे गेले. पावसाचा टिपूसही पडला नाही. पेरण्या खोळंबल्या आहेत. धूळवाफ पेरणी झाली; पण, पाऊस नसल्याने दुबार पेरणी करावी लागणार....' अशी चर्चा वारकऱ्यांत सुरू होती. परंतु, पेरण्या, पाऊस यांची चिंता विठ्ठलावर सोपवून वारकरी पुन्हा प्रस्थान सोहळ्यात दंग झाले.

No comments:

Post a Comment