राजेंद्रकृष्ण कापसे
पुणे - संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बुधवारी रात्री नऊच्या सुमारास निवडुंग्या विठ्ठलमंदिरात दोन दिवसांच्या मुक्कामासाठी विसावला. घेईन मी जन्म याजसाठी देवा।तुझी चरणसेवा साधावया।।या तुकोबारायांच्या अभंगाप्रमाणे मनी भाव ठेवून वारकऱ्यांनी पिंपरी-चिंचवडहून वाटचालीस सुरवात केली. "उठा उठा पांडुरंगा...' या काकडी आरतीच्या अभंगांच्या स्वरांनी आकुर्डीकरांना जाग आली. संत तुकोबारायांच्या पादुकांची पूजा जयवंत कुटे व संस्थानचे सोहळा प्रमुख विश्वस्त विश्वजित मोरे यांच्या हस्ते झाली. पहाटेच पाच वाजता सोहळा पुण्याकडे मार्गस्थ झाला. सकाळी नऊ वाजता पहिल्या विश्रांतीसाठी सोहळा साडेसात ते नऊ वाजण्याच्या सुमारास पिंपरीतील एचए कॉलनीत पोचला. त्यानंतर येथे व कासारवाडीत विश्रांती घेऊन सोहळा दुपारच्या जेवणासाठी दापोडीत पोचला. तासाभराच्या विश्रांतीनंतर खडकीमार्गे सोहळा पुण्याच्या दिशेने निघाला. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास सोहळा वाकडेवाडी येथे आला. येथे महापालिकेच्या वतीने महापौर राजलक्ष्मी भोसले, उपमहापौर चंद्रकांत मोकाटे यांनी पादुकांवर हार अर्पण करून पालखीचे स्वागत केले. यावेळी पालखीसोबत सोहळाप्रमुख बाळासाहेब मोरे, नितीन मोरे, संस्थानचे अध्यक्ष बापूसाहेब मोरे होते. महापालिकेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. नगरसेवक अनिल भोसले यांनी रथाचे सारथ्य केले. अनेक संस्थांनी वारकऱ्यांसाठी अन्नदानासह विविध उपक्रम राबविले. फर्ग्युसन रस्ता, डेक्कन, लक्ष्मी रस्तामार्गे सोहळा नाना पेठेतील निवडुंग्या विठ्ठल मंदिरात समाज आरतीनंतर विसावला. गुरुवारी दिवसभर सोहळा पुण्यात मुक्कामी असेल. शुक्रवारी (ता. १९) सोहळा लोणी काळभोरकडे मार्गस्थ होईल.
No comments:
Post a Comment