Sunday, June 28, 2009

सराटी - पंढरीच्या वाटेवरील एकूण तेराव्या व पुणे जिल्ह्यातील शेवटच्या मुक्कामासाठी तुकोबांचा पालखी सोहळा सराटी येथे शनिवारी संध्याकाळी पोचला. सोहळा रविवारी सकाळी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करीत असून, तिसरे व शेवटचे गोल रिंगण अकलूज येथे होणार आहे. पहाटे पाच वाजता विश्‍वस्त विश्‍वजित मोरे यांनी काकड आरती घेतली. त्यानंतर नगराध्यक्षा विद्या महाजन, बंडोपंत वाघ, शहा, ठाकूर परिवाराच्या वतीने पूजा झाली. शनिवारी रात्री कीर्तन धोंडोपंत दादा दिंडीच्या वतीने, तर जागर केसापुरीकर यांच्या वतीने झाला. गोकुळीचा ओढा (विठ्ठलवाडी), वडापुरी, सुरवड, वकीलवस्ती येथे काही वेळांची विश्रांती घेतली. सकाळची वाटचाल आल्हाददायक वातावरणात झाली. तरी दुपारनंतरचे तळपते ऊन, जोराचा वारा यामुळे वारकऱ्यांची दमछाक होत होती. दुपारच्या जेवणासाठी सोहळा बावडा येथे पोचला. या वेळी सहकार व सांस्कृतिक मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कुटुंबाच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी अन्नदानाचा कार्यक्रम सुरू झाला. या वेळी पाटील कुटुंबाच्या वतीने संस्थानचे अध्यक्ष सोनबा मोरे, सोहळाप्रमुख सूर्यकांत मोरे, संजय मोरे, राजेंद्र मोरे यांचा शाल, श्रीफळ, फेटा बांधून सत्कार करण्यात आला.यंदाचा सोहळा 18 दिवसांचा आहे. त्यातील 13व्या दिवसासाठी सोहळा आज विसावला. आता उरले अवघे पाच मुक्काम. प्रत्येक दिंडीत आता वारकऱ्यांची संख्याही वाढत आहे. सुमारे पाच किलोमीटरपर्यंत वारकऱ्यांची रांग पोचली आहे. आज नीरास्नान व गोल रिंगणरविवारी सकाळी नीरा नदीत पादुकांना विश्‍वस्तांच्या हस्ते स्नान घालण्यात येणार आहे. त्यानंतर अकलूज येथील सदाशिव माने प्रशालेच्या मैदानावर सकाळी तिसरा गोल रिंगण सोहळा होणार आहे. सोहळा अकलूज येथेच विसावणार आहे.

No comments:

Post a Comment