पुण्याचे कारागीर करताहेत माऊलींच्या रथाची सजावट
पंढरपूर - संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या रथाची आकर्षक पद्धतीने फुलांची सजावट मुंबईचे दहा पुष्परचनाकार गेल्या पंचवीस वर्षांपासून मोफत सेवा करीत आहेत.फुलांच्या सजावटीमुळे माऊलींचा रथ आकर्षक दिसतो. रथाच्या सजावटीसाठी सर्व प्रकारची मिळून सुमारे शंभर किलो फुले लागतात. सजावटीची सर्व फुले पुण्याहून आणली जातात. त्यासाठी खास वातानुकूलित वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे.मुंबई व पुण्यामध्ये लग्न, स्वागत सोहळा व धार्मिक कार्यक्रमात पुष्परचना करणारे कारागीर पालखी सोहळ्यात सहभागी होतात.पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पोचताच त्यांची लगबग सुरू होते.आज कोणत्या प्रकारचे तोरण करायचे हे सर्वानुमते ठरताच पटापट फुले गुंफण्यास सुरवात होते.याबाबत बोलताना पुष्परचनाकार चंद्रकांत गावडे म्हणाले, ""आम्ही गेल्या पंचवीस वर्षांपासून माऊलींची सेवा करतोय.रथाच्या सजावटीसाठी लागणारी सर्व फुले आळंदीचे नगराध्यक्ष नानासाहेब गरुड हे स्वतः आणतात. रात्री सात वाजल्यापासून पहाटे पाचपर्यंत आमचे काम चालते. फुलांच्या माळा करण्यासाठी सुमारे पाच तास लागतात. त्यानंतर तोरण गुंफायला घेतो. ते काम खूप नाजूक असल्याने त्यास अधिक वेळ लागतो. किलवर, नेकलेस, गोपद्म, शकुंबरबाबा, बैलमुत्या, एलिफंटा, झालर या प्रकारच्या फुलांची तोरणं आम्ही करतो. रोज नवनवीन प्रकारच्या तोरणांनी माऊलींचा रथ आम्ही सजवतो. रथ सजविण्यासाठी 20 किलो झेंडूची फुले, कारनेशनच्या 25 पेंड्या, 400 पेंड्या लिली, 100 पेंड्या जरबेरा, 50 पेंड्या गुलाब, दोन किलो मोगऱ्याची फुले, अशोक पाला, तुळशीच्या दहा पेंड्या आम्ही वापरतो.''बंडू ठाकूर, प्रकाश ठाकूर, कैलास आवटे, दशरथ गोडसे, कुमार लोंढे, हरी गोडसे, मनोहर शिंदे, शिवाजी साबळे, विठ्ठल सावंत हे पुण्यातील पुष्परचनाकर माऊलींची सेवा करीत आहेत.
No comments:
Post a Comment