Sunday, June 28, 2009

तुकोबारायांची पालखी वरवंडला

तुकोबारायांची पालखी वरवंडला
राजेंद्रकृष्ण कापसे
वरवंड (ता. दौंड) - संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील मुक्कामाच्या ठिकाणी आरतीसाठी जमलेला वैष्णवांचा मेळा. (छायाचित्र - रमेश वत्रे)
वरवंड - समाजआरतीला "ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष, त्याला टाळ-मृदंगांची साथ अन्‌ तुकोबांचा रथ येताच टिपेला पोचलेला गजर... अशा भक्तिरंगात चिंब झालेला संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा मुक्कामासाठी साडेसहा वाजता वरवंड येथे विसावला. शनिवारी संध्याकाळी झालेल्या पावसामुळे जमीन ओली झाली होती. त्यामुळे जिल्हा प रिषद व विद्या विकास मंदिरातील व्हरांड्याचा वारकऱ्यांना आसरा मिळाला. पहाटे महावीर परिवार व कृषी आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी सपत्नीक पादुकांची पूजा केली. या वेळी विश्‍वस्त विश्‍वजित मोरे उपस्थित होते. सकाळी सहा वाजता सोहळा मार्गस्थ झाला. भां डगाव येथे दुपारच्या विसाव्यासाठी सोहळा सकाळी अकराच्या सुमारास पोचला. गावकऱ्यांनी पालखी रथातून खांद्यावर घेतली आणि रोकडोबानाथ मंदिरात विसाव्यासाठी ठेवली. गोपाळ यांनी महानैवेद्य दाखविला. त्यानंतर वारकरी व भाविकांना पिठले-भाकरीचा प्रसाद देण्यात आला. भांडगावहून दुपारी एक वाजता सोहळा मार्गस्थ झाला. चौफुला येथील विसाव्यासाठी सोहळ्याचे आगमन साडेतीन वाजता झाले. या वेळी अध्यक्ष सोनबा मोरे, सूर्यकांत मोरे, संजय मोरे, राजेंद्र मोरे तुकोबांच्या रथाचे सारथ्य करीत होते. शिरूर-सातारा रस्त्यावरील २५ गावांतील भाविक दर्शनासाठी आले होते. सव्वाचारच्या सुमारास जोरदार पाऊस आला. त्यामुळे वारकऱ्यांनी दुकाने, घरे, वाहनांचा आसरा घेतला. अनेकांना उभे राहूनच विसावा घ्यावा लागला. पाऊस सुरू असतानाच साडेचार वाजता सोहळा मार्गस्थ झाला. चौफुला येथील तमाशा कला केंद्राच्या कलाकारांनी अन्नदान केले. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी सोहळा वरवंड गावाजवळ पोचला. गावातील विठ्ठल-रुक्‍मिणी मं दिरासमोर दिंडीतील पताका, टाळकरी, विणेकरी, पखवाज वादक अर्धवर्तुळाकार उभे रा हिले. ज्ञानोबा-तुकारामाचा जयघोष सुरू झाला. टाळकऱ्यांनी मृदंगाच्या स्वरावर ताल धरला. त्यानंतर चोपदारांनी चोप उंचावून समाजआरती घेतली. सोमवारी सकाळी रोटी घाटमार्गे पालखी दौंड तालुक्‍यातून बारामती तालुक्‍यात प्रवेश करणार आहे.

No comments:

Post a Comment