सणसर - काटेवाडीत धोतरांच्या पायघड्यांतून परिटांनी पंढरीची वाट सजविली, तर मेंढ्यांनी तुकोबांच्या पालखीला प्रदक्षिणा घातली. भक्तांच्या उत्साही वातावरणात तुकोबांचा सोहळा सणसर मुक्कामी पोचला. दरम्यान, बारामतीतील पहाटपूजा नगराध्यक्षा मंगल सराफ व एकनाथ काटे यांच्या हस्ते पादुकांची पूजा झाली. सकाळपासूनच सूर्याच्या प्रखर किरणांमुळे वारकऱ्यांच्या अंगातून घामाच्या धारा टपकत होत्या. अशा चिंब झालेल्या वातावरणातच सोहळ्याचे मार्गक्रमण सुरू आहे. पिंपळी, लिमटेक येथील विसावा घेत सोहळा पुढे पुढे सरकत होता. सव्वाबारा वाजण्याचा सुमारास सोहळा काटेवाडीच्या वेशीवर पोचला. येथे सरपंच मीनाक्षी देवकाते, उपसरपंच रेवती गायकवाड, प्रशांत काटे, एकनाथ काटे, अनिल काटे, महादेव कचरे, संजय काटे, शिवाजी काटे यांनी सोहळ्याचे स्वागत केले. इंदापूर रस्त्यावरील कमानीजवळ रथ आला. त्यातून पालखी ग्रामस्थांनी खांद्यावर घेतली. लगेचच परीट बंधूंनी धोतराच्या पायघड्या घालण्यास सुरवात केली. या अनोख्या स्वागताने वारकऱ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. पालखी कट्टा विविध रंगीबेरंगी फुलांनी सजविला होता. आरतीनंतर पालखी विसाव्यासाठी ठेवण्यात आली. दीड तासाच्या विसाव्याने सोहळा तीनच्या सुमारास मार्गस्थ झाला. इंदापूर तालुक्याच्या वतीने तहसीलदार श्रीपती मोरे, सभापती रमेश जाधव, सणसरचे सरपंच विजयसिंह निंबाळकर यांनी स्वागत केले. सणसर येथे सोहळ्यात रात्री पैठणकर दिंडीच्या वतीने कीर्तन तर कानसूरकर दिंडीच्या वतीने जागर करण्यात आला. साडेपाचशे मेंढ्यांचे रिंगणकाटेवाडीगावातून सोहळा इंदापूर रस्त्यावर आला. येथे साडेपाचशे मेंढ्यांनी सव्वातीनच्या सुमारास रथास प्रदक्षिणा घातली. मुक्या प्राण्यांची भक्ती पाहण्यासाठी सोहळ्यातील अनेक भाविकांनी गर्दी केली होती. यंदा अनेक वाहिन्यांनी या घटनेचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी गर्दी केली होती. भक्तिरंगातील अशा विविध रंगांनी बुधवारची वाटचाल सुखकर झाली. भवानीनगर येथे सोहळा बारामतीतून इंदापूर तालुक्यात आला. बेलवडी येथे गुरुवारी सकाळी यंदाच्या सोहळ्यातील पहिले गोल रिंगण सोहळा होणार आहे.सेवा रुजू व्हावी हेच मागणे"पायघड्या टाकण्याची रीत म्हणजे अगत्याने स्वागत करणे. परंपरा जुनी असून, पूर्वी घराघरांतून धोतर एकत्र करीत होतो. परंतु कालांतराने पायघड्यांसाठी आम्ही स्वतंत्र धोतर जोड खरेदी करतो. त्यांचा वापर फक्त पायघड्यांसाठी केला जातो. ती फक्त पालखी येण्यापूर्वी परीट समाजाच्या ताब्यात दिली जातात.'' असे काटेवाडीतील स्वागतप्रमुख पंढरीनाथ काटे यांनी सांगितले, तर "मेंढ्या तुकोबांच्या रथाभोवती प्रदक्षिणा घालतात. त्यामुळे आमच्या मेंढ्यांना रोगराई होत नाही. तसेच तुकोबांच्या चरणी ही सेवा आम्ही अपर्ण करतो,'' असे संभाजी मारुती काळे व तात्या बाबूराव म्हासाळ यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment